पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भोंगळ कारभार चव्हाटय़ावर

रोजंदारी कर्मचाऱ्याकडून बाजार समिती सेस वसुली पावतीत फेरफार
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्याच्या सुचना

पोंभूर्णा :- पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ बसून काहीच महिण्याचा कालावधी लोटलेला असतांना अल्पावधीतच   हे संचालक मंडळ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर च्या चौकशीच्या घेऱ्यात सापडल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर कडून बाजार समिती मधील एका रोजंदारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना मिळाल्याने संचालक मंडळात चांगलीच धावपळ होतांना पाहायला मिळत आहे. पुढे आलेल्या माहितीप्रमाणे पोंभूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश मंकीवार यांनी पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीस १९ ऑक्टोबर २३ रोजी पत्र देऊन पावती क्रमांक १७००५  या पावतीचा वसुली बुक (सेस बुक)ची माहिती मागितलेली होती. परंतु बाजार समितीने त्यांना संबंधित विषयाची माहीती न देता दिनांक २५ ऑक्टोबर रोजीच्या पत्रान्वये पावती बुक क्रमांक १७००५ बाबत तक्रार व अडचणी असल्यास रितसर बाजार समितीकडे तक्रार दाखल करण्यास कळविले होते. त्यामुळे माहिती अर्जदार रूपेश मंकीवार यांनी ३ नोव्हेंबर २३ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करून समंधीत विषयाची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार चौकशीचा भाग म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिनांक २४ नोव्हेंबर, ५ डिसेंबर, १२ डिसेंबर २३ रोजी सुनावनी घेण्यात आली.दिनांक ५ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सुनावनी दरम्यान पोंभूर्णा येथील व्यापारी आशिष अरूण बुक्कावार यांनी मौखिक व लेखी स्वरूपात दिलेल्या बयानात धक्कादायक खुलासा केलेला आहे. व्यापारी आशिष बुक्कावार यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दिलेल्या बयानानुसार पावती क्रमांक १७००५,१७००६ व १७००७ वर नमूद रक्कम रूपये ८८६४/- इतका सेस हा बाजार समितीत कार्यरत रोजंदारी कर्मचारी किशोर बालाजी अर्जूनकार यांचेकडे नगदी स्वरूपात दिलेला आहे. परंतू रोजंदारी कर्मचारी किशोर अर्जूनकर यांनी व्यापारी आशिष बुक्कावार यांना दिलेल्या पावती क्रमांकाचा बुक त्यांना दिलाच गेला नसल्याचे सांगत, शिवाय व्यापारी बुक्कावार यांचेकडून जमा केलेला सेस सुध्दा बाजार समितीत जमा केला नसल्याचे  जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिलेल्या बयानात म्हंटले आहे. प्रकरण एवढ्यावरच न थांबता तत्कालीन सचिव वाय. पि. गेडाम  यांनी दिलेल्या बयानानुसार दिनांक ३१ मार्च २०२१ रोजीच्या पत्रान्वये बाजार समिती आस्थापनेत कार्यरत रोजंदारी कर्मचारी संतूल बोलमवार, सचिन शामराव पोतराजे, संतोष शालीक तेलसे व किशोर बालाजी अर्जूनकार यांना बाजार समितीच्या सेस वसुली पावतीत फेरफार करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. ---------------------------------------------------------*● सामाजिक कार्यकर्ते रूपेश मंकीवार यांच्या तक्रारीची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून गंभीर दखल:-* मागीतलेली माहिती मिळत नसल्याचे पाहून रूपेश मंकीवार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांचेकडे पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी तर केलीच, शिवाय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे सुध्दा तक्रार करत या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. प्रकरणाची गांभिर्यता लक्षात घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सुध्दा या प्रमाणात लक्ष घालत सबंधित विभागाला योग्य चौकशीच्या सुचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. ---------------------------------------------------------*● जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर ची विशेष टिप्पणी:-* या प्रकरणाला आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून गांभिर्याने घेतल्याचे दिसत असून याच अनुषंगाने या कार्यालयाकडून तत्कालीन सचिव  शामराव रामचंद्र पद्मगिरीवार यांचे सुध्दा लेखी बयान घेतले आहे. त्यानुसार पद्मगिरीवार यांनी " मी किशोर बालाजी अर्जूनकार यांना बाजार समितीच्या सेस वसुली पावतीत फेरफार करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच कामावरून कमी करण्यात आले होते असे सभापती रविंद्र मरपल्लीवार यांना  अवगत केले होते. तसेच अर्जूनकार यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते याबाबत उपसभापती आशिष कावटवार यांना याची माहिती होती, कारण विद्यमान उपसभापती आशिष कावटवार हे तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळात संचालक होते. त्याच कार्यकाळात किशोर अर्जूनकर यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. उपरोक्त बाब संचालक मंडळाला माहीत असतांना सुध्दा त्यांना बाजार समितीच्या आस्थापनेत घेतले व त्यांनी पुन्हा सेस वसुली पावत्यांमध्ये फेरफार करून मोठ्ठ्या प्रमाणात बाजार समितीचा सेस बुडवला आहे. एवढि गंभीर प्रकार माहित असुन सुध्दा अर्जूनकार यांना पुन्हा बाजार समितीत रोजंदारी कर्मचारी म्हणून आस्थापनेत कामावर घेण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सात दिवसांत खुलासा मागीतला असल्याने हे प्रकरण आता कोणते वळण घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 🔅============================
Post a Comment (0)
Previous Post Next Post