अमृतची 200 कोटींची देयके काढण्यात मनपाला लगीनघाई _ _प्रदीप देशमुख यांचा पत्रपरिषदेत आरोप

 

चंद्रपूर.:-

2019 मध्ये योग्य कारण न देता अमृत योजनेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर कधी कोरोना तर कधी इतर कारणाने सातत्याने योजनेला मुदतवाढ दिली जात आहे. परंतु, अद्याप शहरातील अनेक भागात लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहे. त्यामुळे मनपातील सत्ताधारी पाणी प्रश्नावर गंभीर नाही. ते केवळ अमृत योजनेतील कंत्राटदाराची देयके काढण्यात हास्पीड आहे. पण कामे जलदगतीने पूर्ण करण्यात लोस्पीड असल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू उर्फ प्रदीप देशमुख यांनी पत्रपरिषदेत केला.

नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत अमृत पाणी पुरवठा योजनेबाबत मनपा कंत्राटदाराला अभय देत असून 200 कोटी रुपयांची देयके काढण्यात मनपाला लगीनघाई झाली आहे. शहरातील पाणी प्रश्न गहन झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेला तीन वर्ष विलंब झाला आहे. योजनेच्या काळात अनेक ठिकाणी खोदकामामुळे धूळ, अपघात तर कुणाला कायमचे अपंगत्व आले. परंतू, कामे संथगतीने सुरू राहिली. या सर्वाला जबाबदार कंत्राटदारावर मात्र, कुठलीही कारवाई झाली नाही. उलट सत्ताधा-यांनी कंत्राटदाराला अभय दिले. त्यामुळे मनपा अधिकारी व सत्ताधारी पाण्यापेक्षा ‘खाण्या’च्या बाबतीत जास्त गंभीर असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

पत्रपरिषदेला जनविकास सेनेचे अक्षय उरकुडे, जितेश शेंडे, कविता अवथनकर, घनश्याम येरगुडे, सुभाष फुलझेले, राहुल दडमल, धर्मेंद्र शेंडे, देवराव हटवार, प्रफुल बैरम आदी उपस्थित होते.  

कंत्राटदारावर कारवाई करा : 1 एप्रिलला धिक्कार आंदोलन

मागील सात दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा बंद आहे. इरई धरणाकडे पाईपलाईनची दुरुस्ती योग्य प्रकारे केली नाही. त्यामुळे सतत दोन वेळा पाईप लाईन डॅमेज झाली. याबाबत नगरसेवक व अधिका-यांची साधी बैठक सुद्धा घेण्यात आली नाही, ही शोकांतिका आहे. योजनेस विलंब करणा-या कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी व दंड करण्यात यावा, या मागणीसाठी जनविकास सेनेतर्फे 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता गांधी चौकात मनपासमोर धिक्कार आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी दिली.

Post a Comment (0)
Previous Post Next Post