भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ग्रामसेवकाची बदली

उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
दाताळा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणाची गटविकास अधिकारी करणार चौकशी

चंद्रपूर : ग्रामसेवक गणेश कोकोडे यांच्या कार्यकाळात दाताळा ग्रामपंचायतीत अनेक गैरप्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी भारत आनंदराव रोहणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपवली. परंतु, या दरम्यानच्या काळात ग्रामसेवकाची बदली झाली. त्यामुळे गटविकास अधिकारी कधी चौकशी करणार आणि ग्रामसेवकावर काय कारवाई होते, याकडे दाताळावासींचे लक्ष लागले आहे.गावातील रेभनकर यांचे शेतात अवैध नालीचे बांधकाम करून ग्रामपंचायतीच्या निधीचा दुरूपयोग केला आहे. रेभनकर यांना वैयक्तीक लाभ मिळवून देण्याकरीता त्यांच्या शेतात बांधकाम करण्यात आले आहे. तिथे कुठलीही जनहीत दिसत नसल्याने गैरवापर करण्यात आलेला निधी वसूल करण्यात यावा. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे कोणतेही आदेश नसताना तसेच शेतात कोणतेही बांधकाम नसताना आर्थिक व्यवहार करून अवैध प्लाटचा नमुना ८ तयार करण्यात आला आहे. मोबाईल टावर, बिल्डींग, हॉटेल व फार्म हाऊसवर यांच्याकडून पैसे घेऊन कर लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे. नालीससफाई न करता नालीसफाईच्या देयकाची उचल केली आहे. तसेच मजुरांची जास्त संख्या व दिवस दाखविण्यात आले. साहित्य खरेदीकरिता निविदा मंजुर असताना वाढीव दराने मुरूम बोलाविणे, जेसीबीचे अवास्तव बिल जोडून पैशाची उचल करण्यात आली आहे. दिवाबत्ती साहित्याचे कोणतेही स्टॉक रजिस्टर ग्रामपंचायतीद्वारे तयार करण्यात आलेले नाही. दर महिन्याला अवास्तव खरेदी दाखवून देयकाची उचल केली जात आहे. आरओ वाटर एटीएमचे रिचार्ज मारताना गावकऱ्यांना कोणतीही पावती न देता रिचार्ज करून दिले जाते. हे रिचार्ज ग्रामपंचायतीमध्ये स्थायी कर्मचारी असताना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केलेल्या गोपाळ महाडोळे यांच्या हातात सर्व आर्थिक व्यवहार देण्यात आले आहेत.कोणताही ठराव नसताना फेरफार फी व कर आकारणी फी म्हणून गोपाळ महाडोळे यांच्या माध्यमातून अवैध वसुली केली जात आहे. कोविड काळात लग्नसमारंभाकरिता नाहरकत प्रमाणपत्राकरीता ५ हजार रुपये याप्रमाणे अवैध वसुली करण्यात आली आहे. कोणताही ठराव न घेता परस्पर नाहरकरत प्रमाणपत्र दिले जात आहेत. मटेरीयल पुरवठादाराची निविदा मंजुर असताना आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळण्याकरीता ऑफलाईन निविदा काढणे, निविदेची जाहीरात प्रकाशित करताना कुणालाही माहिती होऊ नये यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात आली. बांधकाम अंदाजपत्रकानुसार झाले किंवा नाही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बांधकामाचा दर्जा खालावला आहे. बांधकामासाठी लागलेल्या मटेरीयलपेक्षा जास्त प्रमाणाचे देयक जोडुन पैशाची उचल ग्रामसेवक कोकोडे यांनी केली आहे. त्यामुळे यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रोहणे यांनी केली होती. चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश ७ मे २०२५ रोजी एका पत्रान्वये दिले आहेत. परंतु, काही महिन्याअगोदरच कोकोडे यांची बदली झाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या ग्रामसेवकाला नेमका कुणाचा अभय आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गटविकास अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी भारत रोहणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post