देशी दारू दुकान रद्द केले नाही, जिल्हाधिकारी यांना पुन्हा देणार स्मरणपत्र




स्मरणनिवेदनातून देशी दारू दुकान रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा माजी उपमहापौर राहुल पावडे यांचा इशारा

चंद्रपूर:- पावनभूमी व श्रद्धास्थान असलेल्या जगन्नाथ बाबा मठ परिसरातील देशी दारु व बिअर शॉपचे दुकान रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी  समितीच्या माध्यमातून मागील 20 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. परंतु, अद्यापही जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग याबाबत चकार शब्द बोलण्यास तयार नसून कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याने 10 मे रोजी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी समितीच्या नेतृत्वात माजी उपमहापौर राहुल पावडे व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी उद्या हजारोच्या संख्येने महिलांचा सहभाग राहणार असून जिल्हाधिकारी यांना घेराव करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात येत आहे
चंद्रपूर विविध विकास कामांची मालिका सुरू आहे. अशातच संपूर्ण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकारने दारुबंदी उठवून जिल्ह्यात अराजकतेचे वातावरण निर्माण केले आहे. जगन्नाथ बाबा नगरातील देशी दारू व बिअर शॉपी दुकाने रद्द करावी, यासाठी नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. जवळपास मागील 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदने  देवून जनमत चाचणी, विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड, व लक्षवेधी आंदोलनाच्या श्रृंखला चालवून प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु, कुंभकर्णी झोपेत असलल्याचे दाखवून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. पुढे चालून येथे जनप्रक्षोभ भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीकोनातून या परिसरातील देशी दारु दुकान व बिअर शॉपी तातडीने बंद करावी, यासाठी जगन्नाथ बाबानगर संयुक्त दारुबंदी  समितीच्या नेतृत्वात माजी उपमहापौर राहुल पावडे व नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व दारूबंदी विभगास स्मरणपत्र देण्यात येणार आहे. लवकरात लवकर प्रशासनाने यावर ठोस पावलं न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी समितीने दिला आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post