राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ग्रामजयंती निमित्ताने व्याख्यान...



राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे  साहित्य युवकांसाठी प्रेरणास्त्रोत- - बंडोपंत बोढेकर

नागपूर: - राष्ट्रसंत  तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य हे राष्ट्र घडवणारे साहित्य असून हे साहित्य नवयुवकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्यात निश्चितपणे श्रमनिष्ठेचा विचार रूजेल आणि त्यातून राष्ट्र उभारणीसाठी बळ मिळेल, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर  (गडचिरोली)यांनी नागपूर येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बजाज भवन येथे राष्ट्रसंतांच्या ११३ व्या जयंती अर्थात ग्रामजयंती निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन  करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, मनपा आयुक्त  राधाकृष्णन बी, कुलसचिव डॉ. राजु हिवसे,     राष्ट्रसंत अध्यासनाचे प्रमुख डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोरोना संकटात खेड्यातल्या लोकांनी शहरी लोकांना अन्न धान्य पुरवून जगवले. सर्व प्रकारची मदत केली,हे आपण अनुभवले आहे.त्यामुळे खेडी स्वावलंबी होणे गरजेचे आहे. येणाऱ्या संकटावर मात करण्याची क्षमता राष्ट्रसंत साहित्यात असल्याचे ते म्हणाले.
    कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी म्हणाले की, विवेकवादी जीवन जगण्यासाठी  राष्ट्रसंतांनी दिलेला अध्यात्म आणि विज्ञानाचा विचार महत्त्वाचा आहे.विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागात राष्ट्रसंतांना अभिप्रेत कार्य करण्यावर भर देण्यात येईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय डॉ. पाखमोडे यांनी करून दिला. विद्यापीठाचे वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचा मानचिन्ह आणि मानवस्त्र देऊन कुलगुरू डॉ.चौधरी यांनी सत्कार केला.आभार कुलसचिव डॉ.राजू हिवसे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुरूवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात  जाऊन अतिथींनी अधिष्ठानाचे पूजन केले. तसेच राष्ट्रसंतांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post