कळमेश्वर :- कळमेश्वर जवळील घोराड या छोट्याशा गावात दि.१४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रमांचे सुंदर आयोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ , राष्ट्रसंत अध्यासन आणि ग्रामपंचायत कार्यालय घोराड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ११३ जयंती अर्थात ग्रामजयंती घेण्यात आली होती . समारोपीय कार्यक्रम विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर (गडचिरोली) , राष्ट्रसंत अध्यासनाचे प्रमुख डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, सरपंच मंगेश गोतमारे, उपसरपंच चंदूजी चांभारे , ग्रामगीताचार्य उध्दव साबळे, मोहपा येथील नगराध्यक्ष सौ. शोभाताई कऊटकर , माजी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. लेखराम पाखमोडे, ज्ञानेश्वर रक्षक, डॉ.भारती साबळे, ग्रामगीताचार्य सौ. ललिता भागवत , साहेबराव गोहणे, सौ. मंजुषा कऊटकर, पूजा यावलकर,सौ. किर्ती लंगडे,सौ. रेणूका काळे, सौ. अरूणा डांगोरे, सौ. ज्योती बेलसरे, सौ.भावना भेलकर, कु.पायल अंबाडकर , सचिन काळे , सप्तखंजेरीवादक विजय नागपूरे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर बागडे, सुधाकर गोतमारे ,महादेव सय्याम ,सौ.शारदाबाई बन्सोड, सौ.अरुणाताई गेडाम, श्रीमती अरुणाताई गोतमारे ,सौ . अर्चनाताई गोतमारे,सौ. कांचन ताई नागपूरे , पोलीस पाटील सुवर्णा गोतमारे , ग्रामसेवक बि. व्ही. जिरापूरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या पंधरवड्यात रोज सकाळी ग्रामवासियांनी ग्रामस्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे राबविले. दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली तर दि. १५ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शौचालयाची तपासणी करण्यात आली व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दि.१६ एप्रिल रोजी ग्रीन जिम ची स्वच्छता करण्यात आली तसेच मुलांचे व्यायाम व विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. दि.१७ एप्रिल रोजी सुदृढ जनावरे स्पर्धा तर दि. १८ एप्रिल रोजी परसबाग प्रात्यक्षिके , सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला .दि. १९ एप्रिल रोजी आरोग्य जागृती कार्यक्रम घेण्यात आला . पत्र लेखन स्पर्धा, सेंद्रिय खत निर्मिती प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम घेण्यात आले . दिनांक २२एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान गावातील अपंग वंचित घटकांशी चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.दि. २४ एप्रिल रोजी पंचायतराज दिनानिमित्ताने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीपर कार्यक्रम ,शोष खड्डे, बीज संकलन मोहीम हाती घेण्यात आले. डॉ. भारती साबळे यांचे महिलांचे आरोग्य या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले . सायंकाळच्या सत्रात वृक्षलागवडीकरिता खड्डे खोदकाम कार्यक्रम करण्यात आले . दि. ३० एप्रिल रोजी या पंधरवड्याचा समारोप सामूहिक प्रभातफेरी आणि ग्रामनिरीक्षण ने झाला. सायंकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थनेनंतर विविध स्पर्धांची बक्षिसे देण्यात आली .उपस्थित अतिथींनी गावातील विविध उपक्रमांची पाहणी करून गावच्या लोकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले . कार्यक्रमाध्यक्ष मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता दत्तात्रेय वाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित अतिथींनी समयोचित विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सरपंच मंगेश गोतमारे यांनी केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले की, राष्ट्रसंतांचे विचार म्हणजे लोकशिक्षणाचे धडे आहेत. ग्राम सेवा ही ईश्वर सेवा समजून कार्य सुरू ठेवावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार म्हणजे मानवी जीवन जाणिवेला समृद्ध करणारा महामार्ग आहे ,हे जन जागृतीचे कार्य असेच सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी ग्रामजयंती चे महत्व सांगून अध्यासनाच्या विविध उपक्रमाच्या बाबत उपस्थितांना माहिती देत ,घोराडच्या ग्रामस्थांचे कौतुक केले. राष्ट्रसंतांचे विचार गावागावात कृतीतून पोहोचविणे हीच खरी ग्रामजयंती आहे असे सांगून अध्यासनाने असे कृतीकार्य गावागावात लोकांपर्यंत पोहचवावे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वाटमोडे यांनी व्यक्त केले .या पंधरवड्यात गावात अभ्यासिका निर्माण करून वाचनालय समृद्ध करण्यासाठी रोजगार संघाचे वतीने पुस्तके भेट देण्यात आली तसेच रोजगार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर युवकांसाठी घेण्यात आले. त्यात प्रा. संजय नाथे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.गावात रनिंग ट्रॅक चे भूमिपूजन देखील संजय नाथे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.पंचभाई यांनी मानले. राष्ट्रवंदना गायनाने समारोप झाला.
