नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा आरोप
भद्रावती :- विविध कार्यकारी मंडळांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ झाला असल्याचा आरोप करत शेतकरी परिवर्तन पॅनेलचे प्रवक्ता नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती दिली.संस्थेत एकूण 1568 मतदार असून प्रत्यक्षात मतदार यादीत केवळ 667 मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. यादीत हेराफेरी करून 901 मतदारांची नावे यादीतून गहाळ केल्याचा आरोप अनिल धानोरकर यांनी केला आहे. यासोबतच बेपत्ता मतदारांची नावे स्वार्थापोटी जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली आहेत. धानोरकर यांनी मतदार यादीतील नावांपैकी अनेकांकडे शेती नसल्याची माहिती दिली आहे. या सर्व निवडणूक प्रक्रियेत घोळ झाला असून, यामुळे निवडणूक रद्द करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे अनिल धानोरकर यांनी सांगितले.
दरम्यान या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शेतकरी शेतमजदूर सहकार पॅनलचे 13 उमेदवार विजयी झाले आहेत. या उमेदवारांपैकी 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
