चंद्रपूर- : चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात माहिती अधिकाराचा फलकच नाही. शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकाराचा फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र, उत्पादन शुल्क या कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचा फलक दिसून येत नाही, त्यामुळे एकप्रकारे शासकीय नियमांनाच तिलांजली दिल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.सदर कार्यालयात माहिती घेण्याकरिता आलेल्या लोकांना याबद्दल सभ्रम निर्माण होऊन माहिती कुणाला मागावी, मी कुणाकडे जावे.. असा प्रश्न उद्भवतो. कार्यालयातील बाबूच्या टेबलवरती त्यांच्या नावाचे आणि पदाची व नेमप्लेट सुद्धा लावून नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले आहे. मात्र शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकार फलक लावणे अनिवार्य असताना सुद्धा याबद्दलची या कार्यालयामध्ये अनास्था दिसून येत आहे. या महत्वपूर्ण शासकीय आदेशाचे कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून पालन होत नसल्याने कार्यालयात येणा-या नागरिकांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वी देखील या कार्यालयातील गलथान कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. परंतु, माहिती अधिकाराचा फलक न लावण्यामागे येथील अधिका-यांच्या हेतूवरच आता लोकांनी शंका उपस्थित केली आहे.
