गांधी चौक ते जटपूरा गेट पर्यंतचा परिसर देशभक्तीपर वातावरणाने दुमदुमला
चंद्रपूर :आज (दि.२) ला शहरात गांधी चौक ते जटपूरा गेट पर्यंत पार पडलेली राष्ट्रीय एकात्मता दौड ऐतिहासिक ठरली. या दौडमधे हजारोंच्या संख्येने दिव्यांग, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, मॉर्निंग ग्रूपचे सदस्य, विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी विभागातील पदाधिकारी, वकील, डॉक्टर्स, अभियंता, प्राध्यापक, शिक्षक, पोलिस, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दौड चे एक टोक जटपूरा गेट तर दुसरे टोक गांधी चौक असे दिसत होते. चंद्रपूर शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, प्राचार्य मिळून राष्ट्रीय एकात्मता दौड चे स्थानिक गांधी चौक ते जटपूरा गेट पर्यंत आयोजन करण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल, जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीला १५० वर्षे व वंदे मातरम् गीतरचनेला १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने या राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सव २०२६ चे आयोजन शहरात सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय एकात्मता दौड चे आज आयोजन करण्यात आले होते.या दौडकरिता रस्ते रांगोळींनी सुशोभीत करण्यात आली होती. स्वागत गेट लागले होते. रस्त्याच्या दुतर्फा लोहपुरुष सरदार वल्लभभाईजी पटेल व जननायक बिरसाजी मुंडा व वंदे मातरम् कट आउट लागले होते. राष्ट्रभक्तीपर गीत वाजत होते. जटपूरा गेटच्या आतील परिसर नियोजनबद्धरीत्या देशभक्तीपर वातावरणाने सजला होता.सकाळी ८ वाजता गांधी चौकात पांढऱ्या वेशात शहरवासी एकत्रित झाले. दौडच्या सुरवातीला दिव्यांग, त्यानंतर शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुले, ज्येष्ठ नागरिक, शहरातील प्रोफेशनल्स, व्यावसायिक, तरुण या प्रकारे रांगा लावून गांधी चौकाकडे अग्रेसित झाले. दौडमधे पोलिस बँड पथक व संचलन आकर्षण ठरले होते. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आदी जयघोष सुरु होते. जटपूरा गेट वर सहभागींकरिता गोळ्या, बिस्कीट व पाण्याची व्यवस्था होती. दरम्यान राष्ट्रसेवा प्रतिज्ञा घेण्यात आली. गांधी चौक ते जटपूरा गेट परिसर देशभक्तीपर वातावरणाने दुमदुमला होता.