अंधश्रद्धामुक्त समाज निर्माण व्हावा - प्राचार्य खनके

चंद्रपूर (प्रतिनिधी) भारत देशात कर्मकांडाचे स्तोम सर्वच धर्मात बघायला मिळतात. या कर्मकांडातून अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.  त्यामुळे समाजव्यवस्थेने राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करून  समाजातील अंधश्रद्धा दूर कराव्यात , असे मत गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे  जनरल सेक्रेटरी प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी  श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या  सहकार्याने  जिल्हास्तरीय निबंध  स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक मातोश्री विद्यालयात करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी  श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूरचे अध्यक्ष अँड.अशोक यावले,  राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,  दिलीप सुरकर , आनंद माथने, महाराष्ट्र अंनिसचे पी.एम.जाधव,  नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार , पर्यवेक्षक पी.एम. रोकमवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  पी. आर. वसुले उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात अँड. यावले यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत  यांनी सांगितलेले मूल्ये आत्मसात करून आचरणात आणावी, असे प्रतिपादन केले.शालेय गटात प्रथम विजेते नवभारत विद्यालय मूल येथील सलोनी डोहणे, द्वितीय देवनील विद्यालय टेकाडी येथील सुयोग वसाके, तुतीय तन्मय बावणे, केतकी किनेकर, हिमांशु उंदिरवाडे, श्रावणी डोणेकर, मंथन कोटेवार तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम मातोश्री कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत बांबोळे, द्वितीय जनता कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुसची वैष्णवी मेश्राम तर तिसरे बक्षीस वृषाली आगरकाटे, पूर्वा पडगेलवार, लिनाशा अलाम यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्पर्धेस सहकार्य केल्याबद्दल  कवयित्री रोहिणी मंगरूळकर व संगिता पिज्दुरकर  यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. संचालन प्रा. नामदेव मोरे तर आभारप्रदर्शन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले.  राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तसेच याप्रसंगी महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या वतीने लावण्यात आलेल्या व्यसनमुक्तीपर चित्रप्रदर्शनीचे अवलोकन उपस्थित विद्यार्थ्यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post