उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह 3अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

चंद्रपूर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक संजय पाटील यांच्यासह या विभागातील 3 अधिका-यांवर कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.घुग्घूस येथील एका बिअर शॉपीला मान्यता मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि त्यांच्या सहका-यांमार्फत  ती स्वीकारल्या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या तीन अधिका-यांवर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली त्यात उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांचा समावेश आहे.घुग्घुस येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीचे घुग्घुस येथे गोदावरी बार अँड रेस्टॉरंट आहे. यावेळी मालकाला घुग्घूस येथेच बिअर शॉपी सुरू करायची होती. त्यासाठी त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला होता, मात्र मंजूर करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार ही रक्कम देण्यास कधीच तयार नव्हते, त्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत विभागाने सापळा रचून 7 मे रोजी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांच्या आदेशानुसार कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांना तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. जिल्हा अधीक्षक संजय पाटील यांच्या सूचनेवरून ही रक्कम घेतल्याप्रकरणी एसीबीने जिल्हा अधीक्षक संजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post