गडचिरोली काँग्रेसचा वनमंत्र्यांच्या गावात घंटानाद*



*नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष : खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकरांनी घेतली आंदोलकांची भेट*


चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचे मानवावरील हल्ले वाढले असून, आतापर्यंत अनेकांचा व्याघ्र हल्ल्यात बळी गेला आहे. परंतु, वनविभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. वनमंत्रीही गडचिरोली जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची दखल घेत नाही, असा आरोप करीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला. दरम्यान, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलकांची भेट घेत संवाद साधला.गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात गडचिरोली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. किरसान, मिथून ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, सतीश विधाते, मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, अतुल मल्लेलवार, दीपक ठाकरे, अब्दूल पंजवानी, नेताजी गावतुरे, सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे आदींसह गडचिरोली जिल्ह्यासह सावली तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते.
यावेळी वाघ किंवा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मृतकाच्या कुटुंबीयास तत्काळ आर्थिक मदत देणे, गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित वनपट्ट्याचा विषय निकाली काढून नागरिकांना वनपट्टे वितरित करणे, सुरजागड येथील अवैध वृक्षतोडीची चौकशी करणे, जिल्ह्यातील सागवान तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे, वनविभागाच्या परवानगीअभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देणे, वनावर आधारित कुटीरउद्योग जिल्ह्यात निर्माण करणे, पर्यटनस्थळाचा विकास करणे, वनमजुरांवर लावलेले खोटे गुन्हे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वनमंत्री यांना देण्यात आले. दरम्यान, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांसदर्भात केंद्र आणि राज्यसरकारचे लक्ष वेधून प्रश्न निकाली काढू असे आश्वासन यावेळी धानोरकर दाम्पत्यांनी दिले.

*कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या व्यक्तीला २० लक्ष मदत द्या : खासदार बाळू धानोरकर* 

चंद्रपूर : व्यक्ती वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत पावला तर त्याला २० लाख रुपये मदत वनविभागातर्फे देण्यात येते. त्याच प्रमाणे कायमस्वरूपी व्यक्तीला अपंगत्व आल्यास २० लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. त्याच प्रमाणे शासकीय कर्मचारी हल्यात जखमी झाल्यास त्यावर मोठ्या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना देखील उपचार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post