चंद्रपूर :- तालुक्यातील दाताळा (नवीन) येथील सरपंच रवींद्र नामदेव लोनगाडगे यांनी शासकीय निधीची अफरातफर करून पदाचा दुरूपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय अप्पर आयुक्तांनी दिला होता. या निर्णयाविरोधात लोनगाडगे यांनी ग्रामविकास विभागाकडे केलेली अपील फेटाळण्यात आली असून, अप्पर आयुक्तांनी दिलेला निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.दाताळा (नवीन) येथील लोखंडू पुंडलिक रोहणे व नरेश उध्दव चिवंडे यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीअंती मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या चौकशी अहवालातही सरपंचाने कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियमान्वये कारवाई संबंधाने अभिप्राय नोंदविला होता.त्यानंतर अप्पर आयुक्तांच्या आदेशातही आरोप सिद्ध झाल्याने अप्पर आयुक्तांनी 6जुलै 2022 रोजी आदेश निर्गमित करून रवींद्र लोनगाडगे यांना अपात्र घोषित केले होते. अप्पर आयुक्तांच्या या आदेशाविरूद्ध लोनगाडगे यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे अपील दाखल केले होते. मात्र, मंत्रालयानेही त्यांचे अपील खारीज करून अप्पर आयुक्तांनी दिलेला अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला आहे.
