बल्लारपूर :- चंद्रपूरध्यरेल्वे अंतर्गत येणाऱ्या व दक्षिण भारताला जोडणाऱ्या शेवटच्या बल्लारशा स्टेशनवरील अंतर्गत पुलाचा काही भाग रविवारी 27 नोव्हेंबरला सायंकाळी 5.15 च्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत 14 प्रवासी जखमी झाले असून सर्वांना चंदपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे मध्यरेल्वेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी काझीपेठ-पुणे या रेल्वेने स्टेशनवर नेहमी प्रमाणे प्रवासी गोळा झाले होते. ही गाडी कोणत्या क्रमांकावर येईल याची घोषणा न झाल्याने शेकडो प्रवासी प्लॅटफॉर्म नं.1 ते 5 ला जोडणाऱ्या स्टेशन अंतर्गत पुलावर उभे असताना प्लॅटफॉर्म नं.01 वरील अंदाजे 15 फूट सिमेंटचे स्लॅब खाली कोसळले यात पुलावर उभे असलेले 13 प्रवासी खाली कोसळले व जखमी झाले. प्लेटफॉर्मच्या वरचा भाग असल्याने प्राणहानी झाली नाही. दुर्घटना होताच एकच खळबळ उडाली. जखमी मध्ये साची निलेश पाटील, प्रेम तितरे, चैतन्य मनोज भगत, छाया मनोज भगत, निधी मनोज भगत, नयन बाबाराव भिवनवार, राधेश्याम सिंह, अनुराग खरतड, रिया खरतड, स्वीटी खरतड, विकी जयंत भिमलवार, पूजा ओम सोनटक्के, ओम सोनटक्के यांचा समावेश आहे. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. काझीपेठ-पुणे आणि बल्हारशाह-वर्धा पॅसेंजरची वेळ सायंकाळी 5 वाजता बल्हारशाह रेल्वे स्थानकावर एकत्र असल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आणि 50 वर्षे जुन्या फूट ओव्हर ब्रिजला याचा भार सहन केला नाही. आणि हा अपघात झाला. प्रथमदर्शनी हा रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सर्व ग्रामीण रुग्णालयात जखमींना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

