कापड दुकानाला भीषण आग



दिवाळीनिमित्त विक्रीस आणलेले कपडेही आगीत भस्मसात

चंद्रपूर :- शहरात दुकानांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून गुरुवारी रात्री जटपुरा गेट परिसरातील वसंत भवन जवळ असलेल्या एमफोरयु या कापड दुकानाला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. चंद्रपूर महापालिका आपल्या हद्दीतील दुकानांमध्ये अग्निरोधक यंत्रणा स्थापित आहे, अथवा नाही, ह्याची तपासणी करत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, जटपुरा गेट लगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या वसंत भवन ह्या इमारतीत असलेल्या एम फॉर यु या कापड दुकानात रात्री  10:30 वाजताच्या दरम्यान आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत सदर कापड दुकान भस्मसात झाले. दिवाळीनिमित्त विक्रीस आणलेले कपडेही आगीत भस्मसात झाले.
आगीत भस्मसात झालेले सदर दुकान चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर असून प्राप्त माहितीनुसार दुकान मालक 10 वाजताच दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री 11 वाजातच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे लक्षात यायला लागले. दुकानाचे शटर बंद असल्यामुळे आग आतमध्ये लागली तरी बराच वेळ लोकांना कळले नाही. आग लागल्याने काही वेळाने दुकानाचे काच फुटल्याने धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळेच लोकांना आग लागली असल्याचे लक्षात आले.
दरम्यान लोकांनी अग्निशामक दलाला तसेच दुकान मालकांना घटनेची माहिती दिली. घटना कळताच मनपा अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी पोलीस दल, तसेच दंगा नियंत्रक दल सुद्धा घटनास्थळी हजर झाले. सदर आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 3 गाड्या असुनही आग आटोक्यात आणणे कठीण जात होते. सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता असुन दुकानाच्या वरच्या माळ्यावर आग लागली व नंतर ती खालच्या माळ्यावर पसरली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर दुकान आकाश दोडानी ह्यांच्या मालकीचे असुन आगीत दुकान मालकाचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post