*बल्लारपूर रेल्वे पूल अपघात : मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्याला रेल्वेत नोकरी व आर्थिक मदतीत वाढ करून द्या*
*जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील 'फूट ओव्हर ब्रिज' चे फिटनेस तपासा*
*खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अस्विन वैष्णव यांच्याकडे मागणी*
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर फूट ओव्हर ब्रिज तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. नीलिमा रंगारी असे या शिक्षिका असलेल्या मृत महिलेचे नाव असून, त्याच्या कुटंबीयांना आर्थिक साहाय्यासोबतच कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. त्यासोबतच संबंधित रेल्वे अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अधिक भरीव तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून १ डिसेंबर २०२२ ला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र सौंदर्यकरणासोबत मजबुतीकरण झालेली नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओवर ब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली आहे.हि घटना अत्यंत दुर्दैवी असून आज खासदार बाळू धानोरकर यांनी डॉ. मानवटकर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यासोबतच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृतक नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, माजी नगरसेवक भालचंद्र दानव, माजी नगरसेवक बापू अन्सारी, काँग्रेस युवा नेता राहुल चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कुटंबीयांना आर्थिक सहाय्यासह कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी देण्याकरीत रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.२ मे २०१८ मध्ये भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाची जोडी म्हणून चंद्रपूर - बल्लारपूरची निवड झाली होती. त्यावेळी लाखो रुपये फक्त रंगरंगोटीवर खर्च करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्रालयाने हि घोषणा केली होती. त्यामध्ये भारतातील सर्वोत्तम रेल्वे स्थानकामध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूरचा प्रथम क्रमांक जाहीर झाला होता. परंतु त्यावेळी जर या रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज चे फिटनेस तपासले असते तर आज हि घटना घडली नसती. त्यामुळे येत्या काळात याची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अस्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व पुलाची तपासणी करून तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या आहे.
