चंद्रपूर - द एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी संचलित इंदिरा गांधी गार्डन येथे हिंदी दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत हिंदी भाषेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी दिवसानिमित्त झालेल्या प्रार्थना सभेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी जान्हवी जाधव हिने भाषणातून हिंदी भाषेचे महत्त्व आणि इतिहास याविषयी माहिती दिली. याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी यावेळी हिंदी भाषेचा गौरव करणारे सुंदर समूहगीत सादर केले.हिंदी दिनानिमित्त शाळेत विविध रचनात्मक उपक्रम राबविण्यात आले. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी वर्णमाला लेखनावर आपली कलात्मकता सादर केली. तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घोषवाक्य लिहिले. इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी कवितांचे वाचन केले आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस या विषयावर पोस्टर बनवले. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी निबंध लेखन उपक्रमात भाग घेतला.
हे सर्व उपक्रम शाळेतील हिंदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. शाळेच्या उपप्राचार्या पायल कोम्मुरु यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थी आणि शिक्षकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
