निकृष्ठ बांधकामाची चौकशी व्हावी : जिल्हाधिकारी लक्ष देतील काय?
चंद्रपूर :- यावर्षी अति पावसामुळे चंद्रपूर महानगरच नाही, तर तालुक्यातील रस्त्यांची देखील चाळण झाली आहे. याला संबंधित कंत्राटदाराकडून होणारे निकृष्ठ बांधकाम देखील तितकेच कारणीभूत आहे. शहरातील जिल्हाधिकारी यांचा शासकीय बंगला ते जिल्हा क्रीडा संकूलाकडे जाणा-या नवनिर्मित सिमेंट रस्त्याला तडे गेले आहे. मोठ मोठ्या भेगा पडल्याने सदर रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी व्हावी, व याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर महानगरात मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र, याच्या सुमार दर्जामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा गेल्या आहेत, तर कुठे खड्डे पडले आहे. कंत्राटदारांकडून अतिशय निष्काळजीपणे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात येत असल्याने नागरिकांना काही दिवसानंतर या रस्त्यावरून जातांना खाच खळग्यांचा सामना करत गचके खात पुढे जावे लागते. यामुळे अनेकांना मणक्याचे, मान, कंबरेचे आजार होत आहे. परंतु, याकडे स्थानिक प्रशासन गांभिर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. रस्ता तयार झाल्यानंतर काही दिवसांतच या रस्त्याची दैनावस्था होते. यानंतर अनेकदा रस्त्याची डागडुजी करण्यात येते. यात लाखो रुपयांचा चुराडा होतो. जिल्हाधिकारी बंगला ते क्रीडा संकुलाकडे जाणा-या रस्त्यावरून वर्दळ असते. खेळाडु, शाळकरी मुले, शासकीय कर्मचारी व परिसरातील नागरिक या रस्त्याचा नित्य उपयोग करतात. शिवाय हा सिव्हील लाईन परिसर असल्याने अनेक शासकीय कार्यालये या भागात आहे. त्यामुळे येथील रस्त्यांचीच काही दिवसांतच ही अवस्था होत असेल, तर इतर रस्त्यांची काय परिस्थिती असेल, याचा यावरून विचार केलेलाच बरा. त्यामुळे तातडीने या बांधकामाची चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

