श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे वतीने डॉ. गाडेकर महाराज यांना श्रद्धांजली अर्पण



राष्ट्रसंतांच्या मानवतावादी विचार प्रचारार्थ डॉ. गाडेकर महाराज यांचे योगदान मोलाचे  -- ‌बंडोपंत बोढेकर

गडचिरोली :- अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक विठ्ठलराव गोरवे महाराज (आमडी ता. चिमूर ) आणि पाटसूल जि. अकोला येथील सुप्रसिध्द कीर्तनकार  डॉ. उद्धवजी गाडेकर महाराज यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याने अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोली च्या विद्यमाने श्रध्दांजली सभा सामुदायिक प्रार्थना मंदिरात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे होते. याप्रसंगी उल्लेखित दोन्ही कीर्तनकारांना शब्द पुष्पांजली अर्पण करण्यात आली.  गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक डॉ. उध्दवराव गाडेकर महाराज हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या  तत्वज्ञानाचे सच्चे प्रचारक होते. त्यांच्या निधनामुळे मंडळाची फार मोठी हानी झाली , असे प्रतिपादन डॉ. कुंभारे यांनी व्यक्त केले. तर  डॉ. गाडेकर महाराज  यांची अभिनव अशी कीर्तन शैली जनमनावर प्रभाव टाकणारी होती. वर्हाडी बोलीत असणारी त्यांची संवाद शैली श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी असे. प्रभावी कीर्तन आणि श्रीगुरुदेव तत्त्वज्ञानाचा प्रचार- प्रसार करण्यासाठी त्यांनी श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिराचे माध्यमातून  दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे भावपूर्ण मनोगत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. तसेच  याप्रसंगी जिल्हा सचिव पंडितराव पुडके, रामनगर शाखेचे ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे, अरविंद पाटील वासेकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर , श्रीकांत कुत्तरमारे  यांनीही आपल्या भावना   व्यक्त केल्या. त्यानंतर  सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिक्षक पंकज भोगेवार, तूषार निकुरे, नंदनवार,  कवडुजी येरमे आदी गुरुदेव सेवक उपस्थित होते. सामुदायिक प्रार्थना आणि  जयघोष झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post