खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते २२२ अष्ट धातूंची गौतम बुद्धांची प्रतिमा दान
चंद्रपूर : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या जागतिक महामानवांमध्ये तथागत बुद्ध यांचे श्रेष्ठतम स्थान आहे. ज्ञान, शांती व अहिंसा या मूल्यांचे मानवी जीवनातील महत्त्व गौतम बुद्धांनी जगाला पटवून दिले. त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे मानवाला जगण्याची नवी दिशा मिळाली. त्यांनी दिलेल्या मानवी मूल्यांचे पालन आणि रक्षण हा शाश्वत संकल्प आपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते भद्रावती येथील ऐतिहासिक विज्जासन बुद्ध लेणी येथे २२२ अष्ट धातूंची गौतम बुद्धांची प्रतिमा दान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गगन मलिक, नितीन गजभिये, तक्षशिला वाघदरे, अनिरुद्ध दुपारे, विनय बोधी डोंगरे, सुरज गावंडे, जयदेव खाडे, प्रियचंद वाघमारे, कवडू कांबळे, शीला खाडे यांची उपस्थिती होती.यावेळी प्रसिद्ध कव्वाल गायक प्रकाश पाटणकर यांनी 'रात्र निळ्या पाखरांची बुद्ध भीम गीतांची' या संगीतमय प्रबोधनपर कार्यक्रमाने हजारो लोकांना मंत्रमुग्ध केले. पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, सद्यस्थितीत जगभरातील शांतता, स्वस्थता फार मोठ्या प्रमाणात व अगदी झपाट्याने क्षीण होत असल्याचे सहजच स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही. अनेक देश तर युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत, काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, तर अनेक देश युद्धामध्ये होरपळून निघत आहेत किंवा होरपळून निघाले आहेत. त्याचवेळी भौतिक सुखाच्या मागे धावण्याची फार मोठी स्पर्धा जगभरात सुरू आहे आणि ही स्पर्धा न संपणारी किंवा न थांबणारी असल्याचेही लक्षात आल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या धावपळीत मानसिक सुख, मानसिक स्वास्थ्य व मानसिक शांतता कुठेतरी हरवून जात आहे. अशा वेळी तरी बुद्धाने दाखवलेला शाश्वत मार्ग हाच जगाला तारणारा आहे असे त्यानी सांगितले.याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, धम्म याचा अर्थ 'जगण्याचा मार्ग' म्हणजेच 'वे ऑफ लाइफ' असा होतो आणि अर्थातच 'बुद्धाचा धम्म' म्हणजे 'भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेला जगण्याचा मार्ग' असा त्याचा अर्थ होतो. वैश्विक करुणा, मंगल मैत्री, चारित्र्य संपन्नता, शांतता, विवेकाधिष्ठित जीवन अशी अनेकविध मूल्ये ही धम्माचा गाभा आहेत. त्यामुळे सर्वानी गौतम बुद्धाच्या विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
-

