स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा शास. औ. प्र. संस्थेत समारोप: सन्मानपत्र वितरण संपन्न



 गडचिरोली (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देशभक्ती , राष्ट्रध्वज तिरंगा, स्वच्छता , व्यसनमुक्ती विषयावर पथनाट्य तथा लोकभाषेतील गोंडी नृत्य सादरीकरण करण्यात आले होते. विशेषतः  कलाकार अनुराग मुळे, अक्षय कुर्झेकार, कु. उर्वशी मेश्राम   यांनी सादर केलेला प्रयोग सर्वांनाच भावला.  सततच्या पावसामुळे पथनाट्याचे आयोजन सिओई इमारतीत   करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके आणि समिती प्रमुख गटनिदेशक बंडोपंत बोढेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात झालेल्या पथनाट्य सादरीकरणात झाडीपट्टी प्रदेशातील लोककला‌ दर्शन, लोकजीवन, राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्राचे प्रतीक , राष्ट्रीय एकात्मता विषयावर प्रशिक्षणार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करत उपस्थितांचे मन जिंकले. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संस्थेद्वारे आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.  अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते. याप्रसंगी  गटनिदेशक  आनंद मधुपवार, नंदकिशोर हनवतकर,केशव डाबरे, नितीन श्रीगीरीवार , मीना गांगरेडीवर यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी महोत्सवाबाबतचा संपूर्ण आढावा गटनिदेशक बंडोपंत बोढेकर यांनी घेतला. दैनंदिन औद्योगिक प्रशिक्षणासोबतच  संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या विविधांगी उपक्रमाचे कौतुक करून हा अमृत महोत्सवाचा सर्वांगसुंदर सोहळा सदैव आपल्या स्मरणात राहील , असे प्राचार्य संतोष साळुंके याप्रसंगी म्हणाले.  याप्रसंगी तिरंगा रॅली, स्वच्छता अभियान, रांगोळी तथा चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पथनाट्य तथा लोकभाषेतील नृत्य स्पर्धा, पेंटिंग तथा संस्था सुशोभीकरण सारख्या विविध उपक्रमांत सहभागी प्रशिक्षणार्थांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  आभार प्रदर्शन आनंद मधुपवार यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post