बिबट्याला पकडण्यासाठी लावले पिंजरे





जुना पॉवर हाऊस परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

बल्लारपूर :- मागील एक वर्षापासून चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील जुन्या पॉवर हाऊस परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. बिबट्याने शेतकऱ्यांची अनेक पाळीव जनावरे ठार केली व त्या रस्त्याने ये - जा करणाऱ्या नागरिकांवरही हल्ले झाले आहेत. आता तो नागरी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांची सुद्धा शिकार करू लागला आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी याठिकाणी पिंजरे लावले आहे.विसापूर येथील गावकऱ्यांनी मागणी केल्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. विसापूरच्या या हद्दीत आजघडीला तालुका क्रीडा संकुल, बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. 70 ते 80 एकर परिसर हा अजूनही ओसाड पडला आहे. पडके क्वार्टर, घनदाट झुडपे, बारमाही महिने वाहणारा नाला व शेतकऱ्यांची पाळीव जनावरे येथे चराईसाठी येत असल्याने बिबट्याने याच परिसरात आपले बस्तान मांडले आहे. आयती शिकार मिळत असल्याने तो बिनधास्त झाला आहे. यापूर्वी क्रीडा संकुल परिसरात बिबट्याचे हल्ले अधूनमधून सुरूच होते. परंतु मागील दोन महिन्यांपासून हल्ल्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. आता तो दिवसाढवळ्या नागरी वस्तीत येऊन हल्ले करू लागला आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीने तालुक्याचे संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून त्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
Post a Comment (0)
Previous Post Next Post