भद्रावती :- येथील वर्धा नदीच्या पिपरी घाटावर मित्राच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या एका व्यक्तीला जलसमाधी मिळाल्याची घटना आज शनिवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. दिलीप मारोती रणदिवे (50) रा. चंडिका वार्ड भद्रावती असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
झाले असे की, शहरातील चंडिका वॉर्ड येथील रहिवासी प्रकाश टिपले यांचे काल निधन झाले.
मृतकाचे मित्र प्रकाश यांच्या अस्थी विसर्जन करण्याकरीता नातेवाईकांसह वॉर्डातील काही लोक आज वर्धा नदीच्या पिपरी घाटावर गेले होते. यावेळी अस्थी विर्जनासाठी जवळपास 10 ते 12 लोक पाण्यात उतरले. यावेळी मृतक दिलीप रणदिवे हे देखील पाण्यात उतरले होते. दरम्यान खोल पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दिलीप बुडत असल्याचे इतर सहका-यांच्या निदर्शनास येताच ते घाबरून पाण्याबाहेर निघाले. त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केली. परंतु, मदत मिळेपर्यंत दिलीप हे पाण्यात बुडाले होते. याघटनेची भद्रावती पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू पथकाद्वारे पाण्यात त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान सायंकाळी 6.30 वाजता घटनास्थळावरून एक ते दीड किमी अंतरावर त्यांचा मृतदेह मिळाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला. मृतकाच्या पश्चात पत्नी व मुले आहेत. या घटनेमुळ कुटुंबियांवर दु:खाचे सावट पसरले असून पुढील तपास एएसआय मनोहर नांदे करीत आहे.

