जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समिती नेतृत्वात एल्गार
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील जगन्नाथबाबा मठासारख्या पवित्र श्रद्धास्थळावरील चौकात राम सेतू पुलालगत नवीन देशी दारुभट्टी व बियर शॉपीला परवानगी देण्यात आली आहे. या दारु दुकानाला परवानगी देणा-या जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तीव्र निषेध नोंदवून दारुभट्टी व इतर अवैध मादकद्रव्य विक्री व्यवसाय बंद करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच निवेदनाद्वारे मागणी केली. परंतु, मुजोर प्रशासनाला जाग येत नसल्याने जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समितीच्या नेतृत्वात या परिसरातील लोकशक्ती एकवटली आहे. दारुचे दुकान रद्द व्हावे यासाठी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समितीच्या माध्यमातून येथील नागरिकांनी मंगळवारी 19 एप्रिलपासून एल्गार आंदोलन सुरू केले आहे.दारु दुकान रद्द व्हावे, या मागणीसाठी 18 एप्रिल रोजी जगन्नाथ बाबा नगर येथील नागरिकांनी निवेदन देवून विनंती केली होती. परंतु, यावर अद्याप कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. शहराच्या चहुबाजूने दारुची दुकाने सजली आहे. याचा महिलांना व ज्येष्ठांना मोठा त्रास होत असून विशेष करून लहान मुलांवर वाईट संस्कार व परिणाम होत आहे. ही दारु भट्टी रद्द होत नाही, तोवर याविरुद्ध लढा सुरू राहिल, अशी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समितीने घोषणा केली.दरम्यान जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारपासून जगन्नाथ बाबा नगर परिसरातील मठाजवळ नगीनाबाग प्रभागांतील शेकडो नागरिकांसह एल्गार आंदोलन सुरू करण्यात आले आहे.येथील नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानासंदर्भात मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता वॉर्ड वासियांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये या दारूला या प्रभागातून कसे हद्दपार करता येईल, यावर विचार मंथन करण्यात आले. नागरिकांनीही यावेळी एकजूटता दाखविली व परिसरातील अशा कोणत्याही नशीले पदार्थ यांच्या दुकानदारी यापुढे सुरू होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी म्हणून एका समितीचे स्थापन करण्यात आली. या ठिकाणी दारू भट्टीविरुद्ध उपोषण मंडपपात वार्डातील नागरिकांनी एल्गार आंदोलन सुरू केले या बैठकीला वार्डातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता
